Spread the love

मुंबई : प्रतिनिधी

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा- महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भर पावसात झालेल्या सभेत आज अमित शाह यांनी शरद पवार, उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

केंद्रात कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांसाठी, विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी काहीच न केल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागून प्रायश्चित्त घ्या, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी अमरावती येथील जाहीर विजय संकल्प सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिले.

 

काँग्रेस, इंडी आघाडीचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. शरद पवार हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते, केंद्रात कृषीमंत्री होते, पण विदर्भातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केले नाही, त्यामुळेच विदर्भातील हजारो शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवली. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांची माफी मागा, असे आव्हानही त्यांनी दिले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार नवनीत राणा, खा. डॉ .अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रवी राणा, भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.भाजपाला 400 हून अधिक जागांवर विजय मिळाला तर संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार, असा अपप्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. या अपप्रचाराला बळी पडू नका, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने आरक्षण रद्द केले नाही, तर बहुमताचा वापर करून 370 कलम रद्द केले, दहशतवाद संपविला, तिहेरी तलाक प्रथा रद्द केली, आणि सीएए कायदा जारी करण्यासाठी बहुमताचा उपयोग केला. जोपर्यंत देशात भारतीय जनता पार्टी आहे, तोवर एससी, एसटी व ओबीसींचे आरक्षण कोणीही रद्द करू शकणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे, अशी ग्वाही श्री.शाह यांनी दिली. नवनीत राणा यांच्यासाठी दिले जाणारे एक-एक मत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महत्वाचे आहे, देशातील दहशतवाद आणि नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी महत्वाचे आहे आणि भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी महत्वाचे आहे. तुमचे प्रत्येक मत देशप्रेमी आणि देशविरोधी यांच्यातील लढाईत देशप्रेमींच्या बाजूने जाणार आहे, परिवारवादी आणि रामराज्यवादी यांच्यातील लढाईत रामराज्यासाठी जाणार आहे, असेही ते म्हणाले.

 

श्री.शाह म्हणाले की,अयोध्येतील राम मंदिराला काँग्रेसचा व इंडी आघाडीचा कायमच विरोध होता. त्यामुळेच स्वातंत्र्य मिळून 70 वर्षानंतरही काँग्रेस व त्यांच्या आघाडीने अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न लोंबकळत ठेवला. सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षांतच मोदी यांनी राम मंदिराची उभारणी केली, आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना करून मोदी यांनी रामभक्तांची अनेक दशकांची इच्छाही पूर्ण केली. या मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नकली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले,पण सोनिया गांधींच्या भीतीने त्यांनी ते नाकारले. शरद पवारांनाही निमंत्रण दिले,पण प्रकृतीचे कारण देत त्यांनी पाठ फिरविली. प्रकृती ठीक नव्हती, तर आता प्रचारासाठी कसे हिंडता, असा खोचक सवालही त्यांनी केला. या लोकांनी मंदिर उभारणीत अडथळे आणलेच, पण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारून रामाचा अपमान केला, अशी टीकाही त्यांनी केली. केवळ अयोध्याच नव्हे, तर केदारनाथ,बद्रीनाथ, सोमनाथ आदी पवित्र स्थानांचे पुनरुज्जीवन मोदी यांनी केले, असे ते म्हणाले. दहा वर्षांत मोदीजींनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. पुन्हा सत्तेवर आल्यावर पाच वर्षांतच अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येणार असून याचा फायदा, दलित, आदिवासी,वंचित,उपेक्षित सर्वांना होणार आहे. म्हणूनच, मोदीजींच्या झोळीत मतांचे दान टाकून भाजपाला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. मोदी यांनी अनेक कामे केली, पण काही कामे तर मोदी यांच्याखेरीज कोणीच करू शकले नसते, असेही ते म्हणाले.

 

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातील एकएक तरुण काश्मीरसाठी प्राण देण्यास सिद्ध आहे, पण काँग्रेसला याची जाणीवच नाही. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्यावर 5 ऑगस्ट 2019 ला मोदींनी कलम 370 रद्द करून काश्मीरला भारताचा कायमस्वरुपी अविभाज्य भाग बनविला, तर काँग्रेस मात्र कलम 370 ला एखाद्या अनौरस अपत्याप्रमाणे कवटाळून बसली होती, अशी टीकाही त्यांनी केली. दहा वर्षे सोनिया-मनमोहनसिंह यांचे सरकार होते, शरद पवार हे त्यांच्या सरकारात मंत्री होते, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केले नाही, असा थेट आरोप त्यांनी केला.

 

मोदी सत्तेवर आले, आणि पुलवामावर केलेल्या हल्ल्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा धडा त्यांनी शिकविला. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करून मोदींनी दहशतवादाचा सफाया केला. महाराष्ट्राला नक्षलवादापासून मुक्त करण्याचे काम मोदीजींनी केले. काँग्रेस सत्तेवर आली तर तिहेरी तलाक पुन्हा सुरू करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. पण काँग्रेसला पुन्हा सत्ता द्यायची नाही असा निश्चय जनतेनेच केला आहे, असे सांगून शाह यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीतील जनहिताच्या कामांचा संपूर्ण तपशील सभेसमोर ठेवला. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर 70 वर्षांवरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार, घरोघर पाईपद्वारे गॅस जोडणी ही मोदी सरकारची गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले. विदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या विकास कामांचा आणि पाणी योजनांची यादीच शाह यांनी सभेसमोर ठेवली. नवनीत राणा यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीत अमरावती मतदारसंघात केलेल्या विविध कामांची माहितीही त्यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *