Spread the love

मुंबई : प्रतिनिधी

मंडणगड मतदारसंघाचे सलग 25 वर्षे प्रतिनिधीत्व केलेले उबाठा गटातील माजी आमदार सूर्यकांत दळवी, दापोली पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पवार ,राष्ट्रवादी चे नेते व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी संचालक प्रकाश शिगवण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विजय चौधरी, माजी आमदार विनय नातू , भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, सतीश धारप आदी उपस्थित होते.

या वेळी प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपा मध्ये प्रवेश करीत आहेत. श्री. सूर्यकांत दळवी, शांताराम पवार, प्रकाश शिगवण यांच्या प्रवेशाने पक्षाला कोकणात मोठे बळ मिळणार आहे. कोकणातील विकासाचे प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन श्री. बावनकुळे यांनी दिले. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचा यथोचित सन्मान राखला जाईल असेही त्यांनी नमूद केले. कोकणाच्या विकासाचा ध्यास घेतलेले उमदे व्यक्तिमत्व अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सूर्यकांत दळवी यांचे कौतुक केले. भाजपा हा एक परिवार असून, परिवारात सामील झालेल्या प्रत्येक सदस्याचे मनापासून स्वागत केले जाते. कोकणाच्या विकासाला गती देण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध असून ज्या विश्वासाने दळवी यांच्यासोबत सर्वांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासास आमचा पक्ष पात्र ठरेल असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

दळवी म्हणाले की सलग 25 वर्षे आमदार असून देखील उद्धव ठाकरे यांनी नेहमीच आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आमच्या कोकणाच्या विकासासाठी आम्ही भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला. यापुढे भाजपा वाढीसाठी अहोरात्र परिश्रम करू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसचे व उबाठा चे कार्यकर्ते किरण शिंदे,सचिन गुंजाळ, किरण पवार, भाऊसाहेब साबळे आदींनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *